शैक्षणिक कार्य

हिंदू जातीच्या नियमानुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. केवळ उच्च जातींनाच शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे अस्पृश्य कनिष्ठ जातींची स्थिती गुलामापेक्षाही भयंकर झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित होते. च्यामुळे शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल हे त्यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी कनिष्ठ जातींत शिक्षण प्रसार व्हावा म्हणून खालील पावले उचलली.

शैक्षणिक जागृती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कनिष्ठ जातींच्या शैक्षणिक मागासलेपणाची जाणीव होती. हजारो वर्षांपासून त्यांना शिक्षण नाकारलेले होते. अज्ञान व निरक्षरता यामुळेच त्यांचे उच्च जातींनी शोषण केलेले होते. जी हलक्या प्रतीची कामे उच्च जाती स्वत: करीत नव्हत्या ती कामे उच्च जाती कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिक करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कोट्यवधी अनुयायांना ‘‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’’ असा धारदार व महान संदेश दिला.

बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना

कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बहिष्कृत हितकारिणी संघटनेची’ स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे जानेवारी ४, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/– चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने ‘सरस्वती विलास’ नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.

दलित शिक्षणसंस्थेची स्थापना

१४ जून १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कार्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन बाबासाहेबांनी केले. कारण माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नव्हती. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/– चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना

मुख्य लेख: पीपल्स एज्युकेशन सोसायटी

अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली. या संस्थेच्यावतीने १९४६ मध्ये मुंबईतसिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयतर १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालयसर्व समाज बांधवासाठी सुरू केले.

लेखन कार्य

विद्याव्यासंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा व लेखनाचा मोठा छंद होता. त्यासाठी त्यांनी घर राजगृहातच एक समुद्ध ग्रंथालय उभारले. या ग्रंथालयात सुमारे ५०,००० ग्रंथ होते. त्यांनी एकूण ५८ पुस्तके वा ग्रंथ लिहिलेले आहेत. तसेच बाबासाहेबांनी पाच वृत्तपत्रे ही सुरू केली होती.

Comments

Popular Posts