पुरस्कार आणि सन्मान
बोधीसत्व
भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘महान बोधीसत्व’ व मैत्रेय म्हणतात.इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान केला. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता लामांनी सुद्धा त्यांना 'बोधीसत्व' संबोधले होते. बाबासाहेब हे बोधीसत्वहोते परंतु त्यांनी कधीही स्वतःला बोधीसत्व म्हटले नाही.
भारतरत्न
इ.स. १९९० मध्ये, निर्वाणानंतर ३४ वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वात मोठा नागरी पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आला. संविधान निर्मिती व जातीव्यवस्थेतेविरूद्ध प्रखर संघर्ष या दोन प्रमुख मोठ्या गोष्टींमुळे त्यांना हा पुरस्कार दिला गेला.
जगातील १०० विद्वानांत अव्वल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने गौरव केला. विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील शंभर विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बाबासाहेबांची निवड झाली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं.
कोलंबिया विद्यापिठ स्थापन होऊन २००४ मध्ये २५० वर्ष झाले, त्या निमित्ताने अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आगळा वेगळा सन्मान केला. विद्यापीठाने जगभरातल्या १०० विद्वानांची यादी केली आणि या यादीत पहिलं नाव होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं… विशेष म्हणजे या यादीत ते एकमेव भारतीय नाव आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँण्ड पब्लिक अफेअरच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचं पेंटिंग मोठ्या दिमाखात लावण्यात आलं.
याआधी कोलंबिया विद्यापीठाने जगभरातील राष्ट्रांच्या राज्यघटना आणि कायद्याच्या अभ्यासासाठी बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन केलं. या ठिकाणी बाबासाहेबांचं शिल्प आणि त्यांच्या कामाचा गौरव करणारं साहित्यही ठेवण्यात आलं आहे. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले ते १९१३ मध्ये. त्यासाठी त्यांना बडोद्याच्या महाराजांकडून स्कॉलरशिप मिळाली होती. १९१५ साली त्यांनी एमएची पदवी मिळवली. पुढे १९१६ मध्ये याच विद्यापीठातून त्यांनी पीएचडी घेतली.
कोलंबिया विद्यापीठात शिकताना आयुष्यात आपल्याला पहिल्यांदाच सामाजिक समतेचा अनुभव आला असं बाबासाहेबांनी 1930 साली न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. पुढे 1952 मध्ये आंबेडकरांना सामाजिक योगदानाबद्दल सन्माननीय डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. जगभरातील राज्यघटना अभ्यासण्यासाठी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळणं हे आजही महत्वाचं मानलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा विद्यापीठाने केलेला सन्मान भारतासाठी अभिमान ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या कोलंबिया विद्यापीठातल्या विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय तेथे शिक्षण घेण्यासाठी भारत सरकारची एक शिष्यवृत्ती आहे. डॉ. आंबेडकरांच्या थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सत्कार केला होता. पुढे १९९५ मध्ये बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडमतर्फे लेहमन ग्रंथालयाला डॉ. आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला.
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायतत्त्वावर आधारित समाजरचना घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याचे ‘स्वातंत्र्य’, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा हक्क या संविधानाद्वारे सर्व भारतीयांस प्राप्त करून दिला आहे. या अतुलनीय कार्याची पावती कोलंबिया युनिव्हर्सिटीने घेऊन आपल्या द्विशतकसांवत्सरिक उत्सवाप्रसंगी डॉ. आंबेडकरांना ‘एल.एल.डी.- डॉक्टर ऑफ लॉज्’ ही बहुमानाची उपाधी देण्याचं जाहीर केले. कोलंबिया विद्यापीठात दिनांक ५ जून १९५२ रोजी पदवीदान समारंभ झाला. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान सुधारक आणि मानवी हक्काचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष’ असं कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे
सर्वात महान भारतीय
भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतासाठीचे अद्वितीय योगदान व भारतातील कोटय़वधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ‘सर्वात महान भारतीय कोण’? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी २०१२ मध्ये आयोजित केलेल्या सर्वात मोठय़ा सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचे उत्तर आहे — डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे.
सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणार्या १०० नामवंतांची यादी करून त्यातील सर्वात महान भारतीय कोण? असा सवाल भारतीय जनतेसमोर ठेवला होता. तीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मते जाणून घेण्यात आली. दूरध्वनी, मोबाईल व इंटरनेटद्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील २८ नामांकित व्यक्तींना ज्यूरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही पसंतीक्रम नोंदविण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्यूरी अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचा एकंदरीत निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकरांना ‘‘द ग्रेटेस्ट इंडियन’’ ठरवून गेला आहे.
सर्वसामान्य माणसांनी टेलिफोन व सोशल नेटवर्किग साईटद्वारे नोंदविलेल्या मतांपैकी सर्वाधिक १९ लाख ९१ हजार ७३४ मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आहेत. त्याखालोखाल १३ लाख ७४ हजार मते एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाली आहेत. सर्वसामान्य भारतीयांच्या मनातून नेहरू चांगलेच खाली उतरले आहेत, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. लोकांच्या मतांमध्ये नेहरू शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना अवघे ९,९२१ मते मिळाली आहेत. त्या तुलनेत त्यांची कन्या इंदिरा गांधी अधिक लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षण सांगते. लोकांनी त्यांना आठवा क्रमांक दिला आहे. मार्केट रिसर्चमध्ये त्या एपीजेनंतर दुसर्या क्रमांकावर आहेत.
सीएनएन-आयबीनच्या सर्वेक्षणातील मते डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १९,९१,७३४.
एपीजे अब्दुल कलाम – १३,७४,४३१,
वल्लभभाई पटेल – ५,५८,८३५,
अटलबिहारी वाजपेयी – १,६७,३७८,
मदर तेरेसा – ९२,६४५,
जे.आर.डी. टाटा – ५०,४०७,
सचिन तेंडुलकर – ४७,७०६,
इंदिरा गांधी – १७,६४१
लता मंगेशकर – ११,५२०,
जवाहरलाल नेहरू – ९,९२१
Comments
Post a Comment